ठाणे: महाराष्ट्राच्या विविध भागातील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून , कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचे देखणे प्रयोजन केले होते.
हरवलेल्या रसिकांना शोधण्यासाठी तसेच कवितेच्या हरवलेल्या गोत्राला एकसुरी धाग्यात गुंफून नव्या रसिकतेचा शोध घेत ही कवींची मांदियाळी "कवितेच्या पारावर" आपला नाविन्यपूर्ण ठाण मांडून बसली होती. या देखण्या मैफिलीचा नवी मुंबईत हा दुसरा शुभारंभी प्रयोग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनाला मनापासून साद घालत ठाणे,कुर्ला, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा विविध भागांतून कवींनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती.
कविता आणि गाणी वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या जाणाऱ्या या मैफिलीची गोष्ट तशी थोडी निराळी पण रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. "कवितेच्या पारावर" या नावाप्रमाणेच पारावर जमलेल्या कवींनी स्वर व शब्दांच्या साथीने ही मैफिल सजविली. निसर्गकविता, भावकाव्य, प्रेम-विरह, बोलगाणी, गीतगायन त्याप्रमाणे भारूड व गझल अशाप्रकारे कवितेच्या विविधांगी छटांचे येथे सादरीकरण करण्यात आले. मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन देखील तितक्याच ताकदीने कलाकारांच्या भूमिकेत स्पष्ट जाणवत होते.
या मैफिलीत स्वाती भोसले,डॉ.पुनम महाजन, आनंद रांजणे, संगीता काळभोर, महेश भोसले, काव्या भोसले, निती गद्रे, अक्षता गोसावी, रश्मी राऊत, प्रसाद माळी, सचिन पाटील, श्रावणी गोसावी, जिनिशा राऊत, ज्योती माळी, राधा गानू इत्यादी कवी, कवयित्री तसेच कलाकारांनी उत्कृष्ट सहभाग घेऊन आपल्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले.
अशा या रंगतदार कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री/ शिक्षिका तसेच जिजाई बालमंदिर ठाणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. ऋतुजा गवस मॅडम लाभल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग अनुभवण्याचा एक उत्तम योग जुळून आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या मैफिलीत उत्तरोत्तर रंगत वाढत गेली त्यांनी लिहित्या हाताला लेखणीची सवय लागावी म्हणून डायरी तसेच लेखणी सर्व कवींना भेट स्वरूपी प्रदान केली. तसेच शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले मार्गदर्शन प्रबोधनपूर्वक ठरले. मैफिलीला कवयित्री/ लेखिका/ शिक्षिका मा. कल्पना देशमुख या अध्यक्षस्थानी लाभल्या होत्या. त्यांच्या भारूड गायनाने मैफिलीत शोभा आली व मान्यवरांचा उत्साह द्विगुणित झाला. या मैफिलीचे संकल्पनात्मक आयोजन करून कवी अनुकूल माळी यांनी आपल्या बहारदार शैलीत त्रिसूत्री सुत्रसंचालन केले व आयोजक कवी/लेखक/पत्रकार प्रदीप बडदे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशा या रंगतदार मैफिलीत कवितेच्या पारावर रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात एक आनंददायी सायंकाळ अनुभवण्याचा उत्तम योग आला.
-- प्रदीप बडदे, (नवी मुंबई)
Comments
Post a Comment