ओतूर - राष्ट्र सेवा परिषद आणि मराठबोली संस्था ,पुणे यांच्या वतीने, दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना व विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केल्या जाते.
यावेळेस श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ओतूर येथील कवी,लेखक रणजित पवार लिखित व लेण्यांद्री प्रकाशनाने प्रकाशित केलेले, देशातील पहिली महिला कुस्तीपटू ममता पहिलवान या पुस्तकास ' राज्यस्तरीय प्रभुरत्नाई साहित्य गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
१०० वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील पाटोळे या गावची महिला ममता पहिलवान यांनी कुस्तीक्षेत्रात फार मोठे नाव कमावले होते.
त्याकाळात पुरुषासंगे संपूर्ण कपडे काढून फक्त लंगोट घालून आखाड्यात उतरत असे.त्यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढ्या कुस्त्या खेळल्या तेवढया संपूर्ण जिंकल्या.त्यांची परिसरामध्ये 'ममत्या पहिलवान ' म्हणून आजही ओळख आहे.
त्यांचे जीवनचरित्र म्हणजे आजच्या तरुणांसाठी,खास करून मुली व महिलावर्गासाठी एक आदर्श आहे.प्रेरणा देणारे आहे.कारण ज्या काळात महिलांवर अनेक बंधने होती.त्याकाळात पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीखेळामध्ये ममता पहिलवान पुरुष बनून निडरतेने उभी रहायची.
या पुस्तकाची दर्जेदार ,अभ्यासपूर्ण प्रस्तावना डॉ.श्रीपाल सबनीस आणि रामचंद्र जोरवर पुणे यांनी लिहिली असून कुस्तीक्षेत्रातील महिलेवर आधारित मराठी साहित्यविश्वातील हे पहिलेच पुस्तक आहे.
त्यामुळे त्यांचे दुर्लक्षित चरित्र समाजासमोर आले पाहिजे ह्या तळमळीने 'ममता पहिलवान ' हे चरित्र लेखनाची संधी मित्रवर्य डॉ. हरीश बेनके आणि माजी स्वातंत्र्य सैनिक विष्णू जोरवर ,समशेरपूर यांनी दिली.
रणजित पवार यांचे एकूण सात पुस्तके प्रकाशित असून ममता पहिलवान या पुस्तकाची नोंद ' महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स ' या पुस्तकात राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली आहे.
लवकरच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होणार असून हिंदी व इंग्रजी भाषेतही प्रकाशित होणार आहे.
ममता पहिलवान या पुस्तकाला हा दुसरा पुरस्कार मिळणार असून यावेळी कार्यक्रमाला मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे प्राचार्य भाऊसाहेब जाधव,ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, मराठबोली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर उमरदंड ,हेमंत परब ,सचिन कुरकुटे, योगिता पाखले, शिवाजी भापकर, साहेबराव पवळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे संत ज्ञानेश्वर सभागृह ,डेक्कन,पुणे येथे पार पडणार आहे.
Comments
Post a Comment