सर्व प्रियजनांना सस्नेह नमस्कार शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४पितळखोरा लेणी - अभ्यास दौरा (लेणी वर्णणासहीत)
*दान पारमिता फाऊंडेशन - नाशिक* या लेणी संवर्धक संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण अंदाजे १०० ते १२५ लोक पिताळखोरा लेणी येथे क्षेत्र भेट केली.निमित्त होतं एक दिवशीय कार्यशाळा.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुनील खरे सर आणि त्यांचं प्रतिरूप असलेले संस्थेचे मुख्य पदाधिकारी सन्माननीय संतोष अंभोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा सुव्यवस्थित संपन्न झाली.संस्थेच्या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी भारतातील प्राचीन धम्मलिपी ऑनलाईन पध्दतीने शिकून झाले आहेत.धम्मलिपी शिकविणे व लेणी संवर्धनासाठी कार्यशाळा घेणे असे उपक्रम संस्था नियमित राबवित असते.मी या संस्थेशी एक विद्यार्थी म्हणून जोडला गेलो व आज संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून कामकाज करीत आहे याचं मला खूप अप्रूप व समाधान वाटतं.ही कार्यशाळा दिवसभर चालली.मुख्यपदाधिकाऱ्यांनी लेणीची अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना सांगितली.धम्मलिपी मध्ये लिहलेले प्राचीन शिलालेख वाचून दाखवले त्याचं मराठी अनुवादही सांगितले.सदर शिलालेख धम्मलिपी मध्ये लिहलेले आढळत असून शिलालेखांची भाषा प्राचीन भारतातील पालीभाषा आहे.नुकतंच ३ ऑक्टोबर २०२४ ला या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.ही बाब आपणा भारतीयांना अभिमानास्पद आहे.
पितळखोरा लेण्यांचं वर्णन पुढील प्रमाणे करता येईल.
पितळखोरा लेणी महाराष्ट्रातील मराठवाडा लेण्या समुहातील एक लेणी समूह आहे.पितळखोरा लेणी स्थळ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येतात. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटावर सातमाळा पर्वतरांगांमध्ये असलेल्या खडकात १४ गुहा स्मारकांचा समावेश आहे. या गुहा विविध प्रकारच्या बेसाल्ट खडकापासून खोदल्या गेल्या असून काही लेण्यांची दुरवस्था झाली आहे. १४ दगडी लेण्यांपैकी चार चैत्य आहेत आणि उर्वरित विहार आहेत. लेणी दोन गटात विभागली आहेत. एका गटात दहा लेणी आणि दुसऱ्या गटात चार लेणी आहेत. या मध्ये प्रवेशव्दाराशी सैनिकांचे पुतळे आहेत. नऊ हत्तींची रांग आहे.ही रांग आता खराब झाली आहे.सर्व हत्तींचे शिर तुटलेल्या अवस्थेत दिसून येतात.इथे गजलक्ष्मीचे प्रतीक (बुध्दांची माता महामाया)हीचे शिल्प होते ते आता मुंबईच्या वस्तुसंग्रालयात आहे.इथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाके व पाण्याचा निचरा होण्यासाठी जुनी नाला कृती व्यवस्था दिसते. इथं एक नवल दिसतं.वरील पाण्याचा निचरा नाले वाटे होत असतांना खाली प्रवेशद्वारा जवळ जिथे दोन रक्ष उभे आहेत तिथे.डाव्या बाजूला एक पंचमुखी नागाचं शिल्प आहे.या नागाच्या पाचही मुखातून पाण्याच्या धारा वाहताना आज ही दिसते.लेण्यांच्या शेजारी असलेल्या सुंदर पाण्याच्या प्रवाहा मागे पायऱ्यांच्या साहाय्याने लेणीपर्यंत पोहोचता येते. इथे यक्ष,विद्याधर,किन्नर यांच्या आकृत्या दिसतात.
येथे अनेक विहारं आहेत. मुख्य विहाराला गजमालिकेची रचना केलेली दिसून येते. हत्तींची आज बऱ्यापैकी नासधूस झालेली असली, तरीही त्यांच्या उर्वरित आकारावरून ते किती भव्य आणि सुबक असतील, याचा आपल्याला अंदाज येतो.
गजमालिकेच्या बाजूलाच एक प्रवेशद्वार आहे आणि काही पायऱ्यांची रचना केलेली आहे. या प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूनं दोन यक्ष आणि दरवाजाच्या वरील बाजूस महामायेचं शिल्प कोरलं होतं. यातील महामाया शिल्प आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात जतन करण्यात आलं आहे. एका बाजूचा द्वारपाल हा आजमितीस नष्ट झालेल्या अवस्थेत आहे तर दुसरा द्वारपाल आजही पितळखोरा इथं मूळ जागेवर आहे.
अशाप्रकारे दरवाजाची रचना असलेला, गजमालिका असलेला, दोन यक्ष पहारेकरी असलेला प्रकार इतरत्र कुठेही आढळून येत नाही. आतील बाजूस अनेक खोल्यांची रचना केलेली आहे. प्रत्येक खोलीच्या प्रवेशद्वारावर पिंपळपानकृत चैत्यकमानीची रचना दिसून येते. तर खांबावर अनेक प्राणी कोरलेले आहेत. यातील काही सिंह आहेत, नीलगाय आहेत, बैल आहे, घोडे आहेत. विशेष म्हणजे, यातील काही प्राण्यांना पंख दाखवण्यात आले आहेत.
या लेणीसमूहात अनेक शिलालेख कोरण्यात आले आहेत. त्यातील काही शिलालेखांमधून प्रतिष्ठान (आजचे पौठण)आणि धान्यकटक यांसारख्या प्राचीन शहरांचा आणि तेथील व्यापाऱ्यांचा उल्लेख वाचावयास मिळतो. हा लेणीसमूह उज्जैनला जोडण्यात येणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर निर्माण करण्यात आला होता. त्यामुळं अनेक भागातील व्यापाऱ्यांचं इथं येणं-जाणं सुरूच असे.(परदेशी प्राचीन भारतीय मुख्य महमार्ग - मुंबई येथील नालासोपारा - पुण्यातील नाणे घाट - औरंगाबाद मधील पैठण - व पुढे उज्जयनीच्या दिशेने पाटणा (पाटलीपुत्र सम्राट अशोकाची राजधानी) असा होता.बहुतांश लेण्या याच व्यापारी मार्गावर खोदण्यात आल्या आहेत.
यासोबतच, इथे सापडलेल्या एका यक्षाची प्रतिमा आज दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. या यक्षाच्या हातावर ‘कन्हदस’ नामक सोन्याच्या व्यापाऱ्याचं नाव कोरलं आहे. हे शिलालेख लेणींच्या आर्थिक घडामोडी तसेच तत्कालीन महत्त्वाच्या गावांची माहिती पुरवतात.
पितळखोरा लेणी परिसर अतिशय सुंदर आहे. दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक परिस्थिती आणि व्यापाराविषयक अतिशय महत्त्वाची माहिती या लेणींच्या माध्यमातून प्राप्त होते. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरात अशाप्रकारचे दुसरं कुठलंही उदाहरण आपल्याला आढळत नाही, इतका हा लेणीसमूह महत्त्वाचा आहे.
या लेण्यांतील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुहा म्हणजे एक मोठा चैत्य आहे.इथे मधल्या भागात ३५ अष्टकोनी (आर्य अष्टांग मार्ग दर्शविणारे) स्तंभ असून या स्तंभांवर पांढरा, काळा, लाल आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध भिक्खूंची चित्रे आहेत. भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चितारलेले, सजवलेले आहे. मुंडन केलली मुले व बुटक्या मूर्ती गुढघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात. चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील ( सुगंधी द्रव्ये तयार करणारे व्यापारी)मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजधर आहे. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजांनी भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्त्व प्राप्त करून घेतले आहे.
*शिलालेख*
या गुहेत तीन शिलालेख सापडले आहेत. खांबांवर दोन शिलालेख कोरलेले आहेत आणि एक शिलालेख गुहेसमोर ढिगाऱ्याखाली पडलेल्या यक्षाच्या अलिप्त प्रतिमेवर आढळतो. दोन स्तंभ शिलालेखांमध्ये प्रतिष्ठान (आजचे पैठण) येथील विविध कुटुंबांनी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. प्रतिष्ठान हे सातवाहन वंशाच्या सुरुवातीच्या काळात राजधानीचे शहर होते. त्यात भरभराट होत असलेला व्यापार दिसून येतो आणि व्यापारी पश्चिमेकडील किनारी बंदरांकडे प्रवास करत, अशा प्रकारे त्यांच्या वाटेने पितळखोरा मार्गे जात. त्या काळात अनेक व्यापारी बौध्द धम्माला प्रेरीत झाले होते. त्यामुळे बौद्ध चैत्य,विहार आणि मठांना पाठिंबा देण्यासाठी श्रीमंत व्यापारी समुदायांकडून देणग्या मिळत. याचे शिलालेख आढळतात.
चैत्य लेणी क्र .१३ मधील उजव्या रांगेच्या १० व्या खांबावर - "स्तंभ, प्रतिष्ठान (पैठण) कडून गंधी घराण्याच्या (अत्तराचा व्यापारी ) मित्रदेवाची भेट" असे लिहिले आहे. गंधी म्हणजे अत्तर, अशा प्रकारे मित्रदेव हे प्रतिष्ठानचे अत्तर व्यापारी होते.
चैत्य लेणी १४ मधील उजव्या रांगेच्या ११ व्या खांबावर - "स्तंभ, समघकाच्या पुत्रांची भेट, पतिठाणाकडून" असे लिहिले आहे.
गुहे समोरच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या यक्षाच्या प्रतिमेच्या तळहातावर लिहिले आहे, “कान्हदसेन हिरामनाकरेना काटा”, असे सूचित करते की यक्षाची प्रतिमा हिरण्य येथील कान्हदास नावाच्या शिल्पकाराने वक्र केली होती.
एकूण दहा शिलालेख होते.
अनामिक देणगीदाराकडून देणगी १६ “गुणवत्तेची देणगी (अनामिक दात्याची) जी (भगवान बुद्धाच्या चित्रात) आणि देणग्या पाहता येतात. यात जी काही योग्यता आहे, ती (त्याच्या) आई, वडील, पूर्वज आणि सर्व संवेदनशील प्राण्यांसाठी असो. यावर तो आनंदी आहे.”
विष्णूचे दान १७ – “ प्रमदवनाचा पुत्र विष्णूचे दान. या दानाची योग्यता ही भावनाशील जीवांच्या कल्याणासाठी असावी.”
बुद्धदासाचे दान १८ - इथे शाक्य-भिक्षु बुद्धदासाच्या आईच्या देणगीची नोंद आहे आणि त्याची धार्मिक योग्यता सर्वांच्या भल्यासाठी समर्पित आहे.
कान्हडमाचे दान (सा) १९ - "सर्व संवेदनाक्षम प्राण्यांच्या आध्यात्मिक गुणवत्तेसाठी कान्हडसाचे दान"
हाकुसिरी २० चे दान - विक्रमाची सुरुवात नेहमीच्या देणगी सूत्र, दयाधर्मोयम याने होते. त्यापाठोपाठ दात्याचे नाव आहे, शाक्य भिक्ष धम्म हेमो, मायातारा निवासी. हकुसिरी हे नाव देखील ओळींमध्ये आढळते.
२१ – “देयधाम (धर्मो) यम शाक्य (एक फुलांचा नमुना) भिक्षु (क्षो) भाक्र (कु) मा, द्वप्य य (दा) दा त्रा (तू) पु (ता) सा दा (तडा) ), तुपववभाव सा (फुलांचा नमुना)”
एक लहान शिलालेख २२ - "चपला" हा शब्द , देणगीदाराचे नाव, सुवाच्य आहे
आणखी एक लहान शिलालेख २३ – “देयधर्ममय” हा शब्द सुवाच्य आहे
आणखी एक लहान विकृत शिलालेख २४ – “ दुख्खावे” हा शब्द सुवाच्य आहे
आणखी एक छोटा शिलालेख २५ – हा लेख "शाक्यभिक्षु रथस्य सुवर्णा प्रतिमा" म्हणून वाचला . हा शिलालेख आता सापडत नाही शिलालेखाच्या उर्वरित भागांमध्ये सुवर्णप्रतिमा हे शब्द आढळत नाहीत.
सदर विस्तृत माहिती मराठवाड्यातील लेण्यांचा परिचय व इतिहास या पुस्तकातून व गुगल माध्यमातून संदर्भ घेतला आहे.
संतोष रामचंद्र जाधव
शहापूर जि.ठाणे
7507015488
Comments
Post a Comment