ग्रामजीवनातून वर आलेले आणि ग्रामीणतेशी जवळीक असणारे अनेक साहित्यिक साहित्याच्या माध्यमातून ग्रामजीवनाचे सर्वांग सुंदर चित्र रेखाटताना आढळतात. त्यातीलच एक उदयोन्मुख कवी श्रीराम घडे यांचा नामोल्लेख करावा लागेल मराठी साहित्याच्या प्रवाहामध्ये अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या आणि त्या लोकप्रिय ही झाल्या विशेषता ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण कवितेला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे .याच परंपरेचे समृद्धीकरण करणारी साहित्यिकांची नवी पिढी साहित्याच्या क्षेत्रात आश्वासक साहित्य निर्मितीचे कार्य करीत आहेत .आणि त्यांच्या साहित्याचा वाचक वर्ग ही गुण दोषा सहित स्वीकार करतात .अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार खेडयापाड्यातही झपाट्याने झाला आणि खेड्यातल्या खेडूत माणसाच्या जगण्याचे चित्र बदलू लागले .अनेक खेड्यातील सुशिक्षितांची पिढी शहराकडे धाव घेऊ लागली नोकरीच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास असणारी ही सुशिक्षित पिढी खेड्यातील जनजीवन ,शेत -शिवार ,गुरंढोरं , पेरणी, कुळवणी ,नांगरली ,काढणी मळणी , खुरपणी , सालभर कृषकाला करावी लागणारी शेतीतील कामे पडणारा पाऊस शेतात डोलणारी पिके शेतात राबताना त्यांच्या पायाला चिकटलेली चिखल माती आणि त्या मातीचा दर्प त्यांच्या मनात सतत दरवळतो आणि म्हणूनच त्यांच्या साहित्याला शेती मातीचा संदर्भ जोडलेला आहे. या सर्व बाबींचा प्रभाव जन्मताच त्यांच्यावरती आणि त्यांच्या मनावरती असल्याने साहजिकच त्यांच्या साहित्याचा विषय हा शेती माती आणि खेड्यातील जनजीवन लोक परंपरा, रुढी ,रिती रिवाज एकूणच कृषी संस्कृतीचे चित्रण त्यांच्या साहित्यात दिसून येते. सुगीच्या दिवसात आई-वडिलां सोबत शेतात राबणाऱ्या बैलांचा आणि त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद त्यांच्या जगण्याला वेगळा अर्थ प्राप्त करून देणारा आहे. हे सर्व त्यांच्या मनात घर करून असते आणि त्याच आठवणी साहित्य रूपाने येतात
रूमणं हा श्रीराम घडे यांचा काव्यसंग्रह आहे राज युवा प्रकाशन यांनी प्रकाशित केला आणि अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीलाही उतरला वाचकांनीही चांगला प्रतिसाद दिला. श्रीराम घडे हे अलीकडच्या पिढीतील आश्वासक लेखन करणारे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात वाढलेले आणि आजही शेता मातीत राबणारे कवी आहेत. त्यांनी कृषकाच्या जगण्याची व्यथा कवितेतून मांडली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटली परंतु शेती व्यवस्थेमध्ये म्हणाव्यातशा सुविधा उपलब्ध नाहीत आजही निसर्गावर शेती अवलबून आहे तरीसुद्धा शेतकरी खंबीरपणे शेती कसतो .त्याच्या जगण्याची व्यथा चित्रीत करताना कवी म्हणतो
कधी येणार पाऊस
झाली आतुर धरणी
गेला मिरुग सरून
कशी करावी पेरणी
पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनाची अवस्था कवीने कवितेतून चित्रित केलेली आहे.
मिरग सरून गेला तरी पाऊस पडत नाही जर मृग नक्षत्र पडले नाही तर पेरणी वेळेवर होत नाही. आणि पेरणी नाही झाली तर पुढे काय असा प्रश्न समस्त शेतकऱ्याच्या पुढे उभा राहतो. पंढरीचा पांडुरंग आणि शेतकरी याचे अतूट नाते आहे .
कवी म्हणतो
पेरणी पायी यंदा
माझी चुकलीया वारी
पंढरीच्या पांडुरंगा
पडू दे पाऊस भारी
पेरणी वेळेवरती झाली नाही म्हणून पंढरपूरला जाता आले नाही. याची खंत शेतकरी मनातून व्यक्त करतो. आणि त्याच पांडुरंगाला पाऊस पडण्यासाठी शेतशिवारातूनच साकडे घालतो . पंढरीच्या पांडुरंगा विषयी कृषकाच्या मनामध्ये असलेला आदरभाव आणि पांडुरंगा विषयी असणारी अपार श्रद्धा दिसून येते कविता वाचता क्षणी वाचकास पंढरीचा पांडुरंग दिसू लागतो. उपजीविकेचे साधन म्हणून शेतीकडे पाहणारी जशी पिढी आहे. तशीच शेतीला काळी आई म्हणणारी एक पिढी कृषी संस्कृतीचे संवर्धन करीत आहेत. या काव्यसंग्रहातून शेती कसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्याअवजारां विषयी विशेष भाष्य केलेले आहे. शेती करताना वापरली जाणारी अवजारे ही कृषकाची दौलत असते. बैलगाडी ,बैल जोडी ,नांगरणी, कुळवणी ,पेरणी यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांचे संदर्भ यातून शेतकऱ्याच्या जीवनाचा परिचय होतो.
पाऊस वेळेवर ती पडला तर पंढरीच्या पांडुरंगाचे आभार मानणारा शेतकरी सहज बोलून जातो
सारी तुझीच किमया
झाला शिवार हिरवा
साऱ्या जगाचा पोशिंदा
आज आनंदी राहावा
असा हा शेतकरी आणि पंढरीचा पांडुरंग यांचे अतूट असे नाते या कवितेतून कवीने चित्रीत केले असून शेतीमध्ये राबणारा शेतकरी शेतीलाच आपली पंढरी मानून त्या मातीरूपी पांडुरंगाची अखंडपणे सेवा करतो आणि जगाला दोन वेळेचं अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे चित्रण या कवितेतून चित्रीत झाले आहे .दोन वेळेस अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागते ते सांगताना कवी म्हणतो .
ज्वारी कापता उन्हात
जीव करे पाणी पाणी
एक एक दाण्यासाठी
पाय चालं अनवाणी
सालभर राबवून सुद्धा शेतकऱ्यावरती उपासमारीची वेळ येते कधी पाऊस पडतो तर कधी दुष्काळ पडतो कधी अतिवृष्टी तर कधी पाऊसच पडत नाही
केली जाऊन खुडणी
राम पाऱ्यात उठून
जमा करून कणसं
ज्वारी घेतली गाळून
गेली ज्वारी नि कडवा
हाती आलं कसपट
जमा करीत असता
पायी घुसे धसकट
अशा या शेतकऱ्याच्या वास्तव परिस्थितीचे चित्र वाचकाच्या दृष्टीस पडते आणि वाचक अंतर्मुख विचार करू लागतो कविता वाचत असताना वाचकाचे मन पिळवटून जाते .आणि वाचक अंतर्मुख होऊन विचार करू लागतो . बळीराजाची व्यथा मांडताना कवी म्हणतो.
बरबाद झाला बळीराजा हाती काहीही आलंच नाही मुलासारखं वाढवलेलं धान पावसानं तर सोडलंच नाही. कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो .तर कधी वादळाचा तडाखा करावा लागतो रोगराई तर त्याच्या पाचवीलाच पुजलेली असते. आणि हे सार सहन करून सुद्धा पोटच्या लेकरापेक्षाही जास्त शेतावरती प्रेम करणारा शेतकरी अवकाळी पावसाने सर्व शेत शिवार पाण्यात सडून जाते त्याच्यापुढे आत्महत्येचा विचार येतो . कवी म्हणतो
राहिला काय पर्याय आता तूच सांग र देवा
फाशी शिवाय पर्याय नाही हा पाऊस जाईल कवा
अशा या कृषिप्रधान देशातील कृषकाची व्यथा कवितेतून कवीने मांडलेली आहे असे अनेक दुष्काळाचे अतिवृष्टीचे वादळी पावसाच्या तडाख्याचे आणि रोगराईचे असंख्य घाव सहन करत हा जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा कंबर खचून शेती पिकवण्यास उभा राहतो पुढे कवी म्हणतो
रोज लावून कपाळी ढेकळाचा आम्ही टिळा
घाम गाळतो मातीत
तवा पिकतोय मळा पंढरीच्या पांडुरंगाचा अबीर समजून काळ्याआईचा टिळा भाळावरती लावणाऱ्या
शेतकऱ्याच्या अनेक पिढ्या मातीत राबत राहिल्या आणि आजही मातीमध्ये निष्ठेने ,मायेने ममतेने, श्रद्धेने अखंड कष्ट करीत आहेत म्हणूनच या जगाचा पसारा चालतो आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही .
पुढे कवी म्हणतो.
औत येताच धुर्याला
असतं बैलाचं फिरणं तिफन चालावी तासानं धरतो हातात रुमणं
असा हा शेतकरी पेरणी कुळवणी बैजवार व्हावी पेरलेलं धान्य मातीत व्यवस्थित मुजुन जावे आणि रुजून वरती यावे व चैतन्य फुलून यावे तिफन सरळ तासातून चालावी यासाठी रुमण्याचा आधार घेतो रूमन्यामुळे तिफन सरळ रेषेत समांतर चालावी म्हणून हातामध्ये रूमला घेऊन हा जगाचा पोशिंदा जगाच्या कल्याणासाठी आणि त्याच्या दोन वेळच्या पोटभर जेवणासाठी अखंडपणे राबवत असतो रुमण्या सारखा ताट उभा राहतो आणि शेतीव्यवस्थेचा कणा बनवून सतत राबतो म्हणूनच या काव्यसंग्रहाला रूमनं असे नाव दिले असावे असे म्हणावे वाटते अवजारांचे तपशील कवीने अचूकपणे कवितेत टिपले आहेत या सर्व अवजारांचा आज नायनाट होत असताना कवीच्या मनाला खूप वाईट वाटते आहे जुनं ते सोनं म्हणणारा कवी श्रीराम घडे यांच्या सर्व कविता या वाचक मनाला भिडणाऱ्या आहेत यात मात्र शंका नाही या काव्यसंग्रहास लाभलेली प्रस्तावना ही पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध कवी ,चित्रपट गीतकार मा. श्री .हनुमंत चांदगुडे यांची असून या प्रस्तावनेमुळे काव्यसंग्रहाची वांग्मयीन उंची वाढल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आधुनिक बहिणाबाई समजल्या जाणाऱ्या विमलताई माळी यांचाही शब्दरूपी आशीर्वाद ही या काव्यसंग्रहाची वेगळी ओळख आहे असे म्हणावे वाटते . त्याचबरोबर प्रमोद घोरपडे यांच्याही शुभेच्छा या कवीच्या प्रतिभेला प्रेरक ठरणाऱ्या आहेत. काव्यसंग्रहाचे शीर्षक आणि मुखपृष्ठ अत्यंत सुंदर आणि कवितेची उंची वाढविणारे आहे आहे हे मुखपृष्ठकाचे कौशल्य आहे श्रीराम घडे हे स्वतःच्या स्वतंत्र शैलीतून व्यक्त होतात. त्यांच्यावरती कोणत्याही बुजुर्ग साहित्यिक पिढीचा प्रभाव जाणवत नाही त्यांची प्रतिभा स्वतंत्रशैलीतून व चित्रमय शैलीतून निर्माण झालेली आहे .हे ठामपणे नमूद करावेसे वाटते. काव्यसंग्रहामुळे साहित्य दालनात मोलाची भर पडेल असा आशावाद श्रीराम घडे यांनी साहित्यिक म्हणून स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे .पुढील लेखन प्रवासास लक्ष लक्ष शुभेच्छा !
शब्दांकन
प्रा नंदकुमार शेडगे.
मो .९७६६२०९२१ ४
कवी : श्रीराम घडे
मो.८८०६०४२६६०
रुमणं : काव्यसंग्रह
राजयुवा प्रकाशन
प्रथम आवृत्ती :३ ऑगस्ट २०२४
मूल्य :१५० रु
पृष्ठ संख्या १०४
Comments
Post a Comment