जळगाव [ राजेंद्र चौधरी ] :- १३डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरुन वरिष्ठ पोलीस अधिकार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयितांना शिताफिने पकडण्यात यश मिळाले. सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे दोन संशयित नावे शेख आरिफ शेख फारुक, अझरखान आयुब खान दोघे ख्वाजा नगर सावदा येथील राहणार असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडून भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या शंभर रुपये दराच्या ७६ चलनी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण ३७,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून यातील मुख्य सुत्रधाराचा शोध पोलीस घेत आहे.